फरिदकोट : पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्यावरून पंजाबच्या फरिदकोट, मोगा आणि संगरूरसह अन्य काही शहरांमध्ये बुधवारी हिंसाचार उफाळला. यात गोळीबारात दोन जण मारले गेले तर पोलीस महानिरीक्षकासह ७५ जण जखमी झाले.फरिदकोट जिल्ह्याच्या बेहबल कलान गावातून या हिंसाचाराला सुरुवात झाली. येथे निदर्शने करणारे विविध शीख संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यादरम्यान भीषण संघर्ष उडाला. निदर्शकांनी अनेक रस्ते अडविले. हे रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस आले तेव्हा निदर्शकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी निदर्शक व पोलीस यांच्यात संघर्ष झाला आणि पोलिसांना आत्मरक्षणार्थ लाठीहल्ला, पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि शेवटी गोळीबार करावा लागला. या गोळीबारात दोन तरुण ठार आणि अनेक जखमी झाले. गावातील परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले.त्याआधी फरिदकोटच्याच कोटकपुरा येथे निदर्शक आणि पोलीस यांच्यात संघर्ष उडाला. या संघर्षात भटिंडा परिमंडळचे पोलीस महानिरीक्षक जे.के. जैन यांच्यासह ७५ जण जखमी झाले. जखमींमध्ये १५ पोलिसांचा समावेश आहे. संगरूर आणि मोगा येथेही निदर्शक व पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)
धर्मग्रंथाची विटंबना; पंजाबमध्ये हिंसाचार
By admin | Published: October 14, 2015 11:42 PM