ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ललित मोदीप्रकरणात वसुंधरा राजे यांची पाठराखण केली असतानाच भाजपा खासदार आर के सिंह यांनी ललित मोदींना मदत करु नये असे परखड मत मांडत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह व ललित मोदी यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरुच राहील असे स्पष्ट केल्याने ललित मोदी प्रकरणावरुन भाजपामध्येच मतभेद निर्माण झाल्याचे दिसते.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ललिल मोदींना मदत केल्याने काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपा नेत्यांनी सुषमा स्वराज यांचा बचाव केला असून सोमवारी वसुंधरा राजे यांनाही पक्षश्रेष्ठींचा वरदहस्त मिळवण्यात यश आले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे बिहारमधील खासदार व माजी केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांनी ललित मोदी प्रकरणावरुन पक्षाशी विसंगत भूमिका घेतली. ललित मोदी हे फरार असून त्यांना कोणीही मदत करायला नको, केंद्र सरकारने ललित मोदींचा पासपोर्टही रद्द करावा असे त्यांनी म्हटले आहे. ललित मोदी यांना पुन्हा मायदेशी आणून त्यांच्याविरोधात खटला चालवावा व मोदीला एका आरोपीप्रमाणेच वागणूक द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. राकेश मारियांनी ललित मोदींची भेट घेतल्यासंदर्भात सिंह म्हणाले,एका पोलिस आयुक्ताने ललित मोदींची भेट घेणे चुकीचे आहे, राकेश मारियांनी ललित मोदींची भेट घ्यायला नको होती असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील दुष्यंत सिंह व ललित मोदींमधील आर्थिक व्यवहारांना अद्याप क्लीन चीट दिलेली नाही असे स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु राहील असेही त्यांनी नमूद केले.