तिरुवनंतपुरम - केरळमध्ये कोविड-१९च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्याच्या आर्थिक मदतीशिवाय अतिरिक्त पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल. मात्र केरळ सरकारच्या या योजनेत केवळ गरीब कुटुंबांचाच समावेश असेल.
केरळ सरकारने दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पाच हजार रुपयांची अतिरिक्त मासिक मदत तीन वर्षांपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड-१९मुळे मृत्यू झालेल्या बीपीएल कुटुंबांना हे सहाय्य मिळणार आहे. अशा कुटुंबांना सोशल वेल्फेयर, वेल्फेयर फंड किंवा अन्य पेन्शन फंडची उपलब्धता यासाठी अपात्र ठरवणार नाही.
या योजनेबाबत पुढे सांगण्यात आले की, या योजनेचा लाभ त्या कुटुंबांना मिळेल जी राज्यामध्ये राहत आहेत. अशा व्यक्तीचा मृत्यू भलेही राज्यामध्ये किंवा राज्याबाहेर किंवा देशाबाहेर झालेला असो. कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आश्रितांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका पानाचे निवेदन जमा करावे लागेल. सरकारकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सांगण्यात आले की, संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अधिकारी आश्रित कुटुंबामधील कुणी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये किंवा आयकरदाता नाही ना, याचा आढावा घेतली. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना कार्यालयात बोलवले जाणार नाही.