सुनील चावके नवी दिल्ली : आपल्या कुटुंबाचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्यामुळे राहुल गांधी यांच्या याचिकेवरील सुनावणी आपल्या पीठासमोर होण्याविषयी कोणाला आक्षेप आहे का? अशी विचारणा करीत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या पारदर्शीपणाचा परिचय घडविला. आपल्याविषयी कोणताही आक्षेप नाही, असे सांगत उभय पक्षांच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी न्या. गवई यांच्या सचोटीवर मोहोर उमटविली. राहुल गांधी यांच्यावतीने विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद सुरू करण्यापूर्वीच न्या. गवई यांनी कर्तव्याची बाब म्हणून आपली बाजू स्पष्ट केली. आपले वडील स्व. रा. सु. गवई यांचे काँग्रेस पक्षाशी निकटचे संबंध होते. त्यांची अभिषेक मनू सिंघवी तसेच जेठमलानी यांच्या वडिलांशीही चांगली मैत्री होती, असे म्हटले.
...तर मी दूर राहण्यास तयारn आपण एका प्रकरणात महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी यांचे कनिष्ठ सहकारी म्हणूनही काम केले आहे. आपले वडील काँग्रेसच्या समर्थनाने लोकसभेवर निवडून आले होते. आपले भाऊही काँग्रेस पक्षात आहेत. आपली काँग्रेसशी पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणावर प्रभाव पडेल, असे तुम्हाला वाटत असेल तर या प्रकरणापासून आपली दूर राहण्याची तयारी आहे.
n आपल्या कारकीर्दीवर या राजकीय पार्श्वभूमीचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. तरीही या प्रकरणात आपले वैयक्तिक मत वेगळे असू शकते, असे वाटून तुम्हाला आक्षेप असेल तर या प्रकरणाची सुनावणी माझ्यापुढे व्हावी की नाही, हे तुम्ही ठरवा, असे स्पष्टपणे नमूद करून न्या. गवई यांनी दोन्ही वकिलांचा सल्ला मागितला. त्यावर आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचे सिंघवी आणि जेठमलानी यांनी सांगितले.