काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुजरातचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांना सामाजिक कार्यासाठी हा सन्मान मिळाला आहे. यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे, या गिफ्टची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण, कुटुंबीयांनी सावजीभाईंना 50 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर सरप्राईज गिफ्ट म्हणून दिले आहे. बोलले जाते की, 1 फेब्रुवारीला मुंबईत सावजीभाईंना त्यांचे भाऊ तुलसीभाई, घनश्यामभाई आणि हिम्मतभाईंसह कुटुंबातील 8 मुलांनी सरप्राइज देण्याचा विचार केला होता.
यासाठी त्यांनी एकत्रिपणे एका पार्टीचे आयोजन केले आणि त्या पार्टीत सावजीभाईंना 50 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर भेट दिले. यावर सावजीभाई ढोलकिया म्हणाले, माझ्या कुटुंबीयांनी मला ही भेट देण्याचा निर्णय घेतला, यासंदर्भात मला माहीत नव्हते. पण जे दिले आहे, ते मनापासून स्वीकारले आहे. कौटुंबिक प्रेम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. यानंतर त्यांनी, आता लोकांना आणीबाणीच्या प्रसंगी आमच्याकडून हेलीकॉप्टर दिले जाईल, अशी घोषणाही केली.
कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी खर्च केले होते 51 कोटी -सावजीभाई यांचे भाऊ तुलसीभाई म्हणाले, माझे भाऊ दर वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागडी दिवाळी भेट देऊन आश्चर्यचकित करतात. त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांना काय भेट द्यावी, कोणती गोष्ट त्यांना उपयोगी पडेल, यावर आम्ही खूप मंथन केले. यानंतर आम्ही त्यांना हेलिकॉप्टर भेट देण्याचा निर्णय घेतला.
सावजीभाई ढोलकिया हे हरी कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन आहेत. बोलले जाते की, 1991 मध्ये त्यांच्या कंपनीचा व्यवसाय केवळ 1 कोटींचा होता, जो मार्च 2014 पर्यंत 2100 कोटींवर पोहोचला. 2018 मध्ये, त्यांच्या कंपनीने सुवर्ण महोत्सवानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी 51 कोटी रुपये खर्च केले होते. तसेच एक वर्षी त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 491 कार आणि 200 फ्लॅट्स गिफ्ट केले होते.