नवी दिल्ली - सुमारे दीड वर्षापूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील 11 जणांनी रहस्यमयरीत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून या घराकडे स्थानिक लोक भीतीच्या नजरेने पाहत होते. तसेच या घराबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या घराबाबत वाटणारी भीती आणि अंधश्रद्धांना झुगारत येथे एक कुटुंब वास्तव्यास आले आहे. मोहन कश्यप असे या कुटुंबातील कुटुंबप्रमुखांचे नाव असून, त्यांनी आपण भूतप्रेत, अंधविश्वास मानत नसल्याचे सांगितले. मोहन कश्यप यांनी येथे डायग्नॉस्टिक सेंटर उघडले असून, आज तेथे पूजाविधी करून कामसुद्धा सुरू केले आहे. बुराडीमधील हे घर आणि त्याविषयी पसरलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोहन कश्यप म्हणाले की, ''मी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. जर अशा गोष्टींवर माझा विश्वास असता तर मी येथे आलोच नसतो. मात्र आपल्याकडे कुठल्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी-गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मीसुद्धा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली.''
भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:41 PM