अहमदाबाद: जगातील सगळ्यात उंच पुतळा असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला देशासह जगभरातून पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये तर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. गेल्या रविवारी बडोद्यातलं एक कुटुंब स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला गेलं होतं. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झालं. त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दलची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर डभोई जवळच्या नर्मदा सरोवर कालव्यातून संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडोद्यात राहणारे कल्पेश परमार, त्यांची पत्नी तृप्ती परमार, आई उषा, मुलगा अथर्व आणि मुलगी नियतीसह १ मार्चला कारमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला निघाले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर परमार कुटुंबानं त्यांचा फोटो नातेवाईकांना पाठवला. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी केवाडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बेपत्ता कुटुंबाचा शोध सुरू केला. दरम्यान नर्मदा कालव्याजवळ काही जणांनी एका महिलेचा मृतदेह पाहिला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी महिलेचा मृतदेह सापडला. त्यांच्या कपड्यांवरुन आणि दागिन्यांवरुन मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यात शोध घेतला. त्यावेळी कालव्यात कार आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी परमार कुटुंबातल्या सदस्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन त्यांचा शोध घेतला. परमार कुटुंबाची कार कालव्यात कशी कोसळली, याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मुलांनी हट्ट धरल्यानं कुटुंबाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला घेऊन गेले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 09:07 IST
सरोवराजवळील कालव्यात परमार कुटुंबाचे मृतदेह सापडले
मुलांनी हट्ट धरल्यानं कुटुंबाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला घेऊन गेले अन्...
ठळक मुद्देरविवारपासून बेपत्ता होतं बडोद्यातलं परमार कुटुंबचार दिवसांच्या शोधानंतर सापडले कुटुंबाचे मृतदेहकार कोसळून अपघात झाल्याचा संशय