सध्या टोमॅटोचे भाव वाढत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, टोमॅटोच्या किमती पाहिल्या तर गेल्या महिनाभरात त्यात 326.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे लोक त्रासले असतील, परंतु शेतकरी कुटुंबासाठी ही एक बंपर कमाईची संधी बनली आहे. कर्नाटकच्या कोलारमध्ये एका शेतकरी कुटुंबाने एकूण टोमॅटोचे 2000 कॅरेट विकले आणि एकूण 38 लाख रुपयांची कमाई करून घरी परतले.
प्रभाकर गुप्ता आणि त्यांचा भाऊ 40 वर्षांहून अधिक काळ शेती करत असून त्यांच्याकडे जिल्ह्यातील बेठमंगळा येथे 40 एकर जमीन आहे. आतापर्यंत प्रभाकर गुप्ता यांच्या कुटुंबाला 15 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटसाठी 800 रुपये मिळाले, ही त्यांची आजपर्यंतची सर्वोत्तम कमाई होती. मात्र, या मंगळवारी त्यांनी 15 किलोचं कॅरेट 1900 रुपयांना विकलं. प्रभाकर गुप्ता यांच्या भावाने सांगितले की ते फक्त उच्च दर्जाचे टोमॅटो पिकवतात
टोमॅटो विक्रेते शेतकरी वेंकटरमण रेड्डी हे चिंतामणी तालुक्यातील व्याजकुर गावचे रहिवासी आहेत. मंगळवारी त्यांनी 15 किलो टोमॅटोचं कॅरेट एकूण 2,200 रुपयांना विकलं. त्यांनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या पिकासाठी सर्वाधिक भाव मिळाला होता, जेव्हा त्यांना 15 किलो टोमॅटोच्या कॅरेटसाठी 900 रुपये मिळत होते. त्यांनी आता टोमॅटो पिकातून 3.3 लाख रुपये कमावले.
वेंकटरमण रेड्डी यांनी त्यांच्या एक एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले होते आणि त्यासाठी त्यांना यावर्षी बंपर नफा मिळाला. टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने टोमॅटोचे भाव वाढत असल्याची माहिती कोलारच्या केआरएस टोमॅटो मार्केटचे सुधाकर रेड्डी यांनी दिली. या मंडईत मंगळवारी 15 किलो टोमॅटोचं कॅरेट 2200 ते 1900 रुपये या दराने विकलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.