बंगळुरू: कर्नाटकातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलीच्या विवाहाआधीचे विधी पार पडत असताना अचानक तिला भोवळ आली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्यानं डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र दु:खातून सावरत त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मुलीचे अवयव दान करून गरजूंना नवं आयुष्य देण्याचा कौतुकास्पद निर्णय दोन्ही कुटुंबांकडून घेण्यात आला.
कोलार जिल्ह्यातल्या कोडिचेरुवू गावात वास्तव्यास असलेल्या चैत्रा के. आरचा विवाह सोहळा ७ फेब्रुवारीला होणार होता. आदल्या दिवशी विधी सुरू होते. नवरा-नवरीचे फोटो काढले जात होते. दोन्ही कुटुंब आनंदात होती. मात्र तितक्यात चैत्रा चक्कर येऊन कोसळली. तिला बंगळुरूतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. प्रयत्नांची शर्थ करूनही डॉक्टरांच्या पदरी निराशा पडली.
चैत्राच्या लग्नामुळे आनंदात असलेल्या तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्यांनी तिचे अवयव दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला. चैत्राच्या दोन्ही किडणी, हार्ट व्हॉल्व आणि कॉर्निया काढण्यात आला. राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या माध्यमातून हे अवयव गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले. ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव देण्यात आल्याची कर्नाटकातील यंदाच्या वर्षातील ही १२ वी घटना आहे.