रांची- माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव सध्या रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्था (रिम्स) या रुग्णालयात उपचार घेत आहेत. रिम्स रुग्णालयाच्या आसपास असणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आपल्याला झोप येत नाही अशी तक्रार लालू प्रसाद यांनी केली आहे. त्यांचे निकटवर्तिय भोला यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबरच त्यांच्या खोलीतील बाथरूमची स्थिती अत्यंत वाईट असल्याची तक्रार लालू यांनी केली आहे. या बाथरुममधून दुर्गंधी येते असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे लालूप्रसाद यांनी काही नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.