प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर करणार हिंदू धर्माचा स्वीकार, जनरल रावत यांच्या झालेल्या अपमानामुळे व्यथित होऊन घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 11:14 AM2021-12-11T11:14:08+5:302021-12-11T11:27:05+5:30
Bipin Rawat Helicopter Crash: प्रसिद्ध चित्रपट निर्माते Ali Akbar यांनी त्यांच्या पत्नीसह धर्मांतर करून Hindu धर्मामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आपण धर्मांतराचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोच्ची - प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नीसह धर्मांतर करून हिंदू धर्मामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आपण धर्मांतराचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. जनरल रावत यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर काही लोकांनी कथितपणे स्मायलीच्या इमोजी टाकल्या होत्या. बुधवारी तामिळनाडूतील कुनूर जिल्ह्यामध्ये झालेल्या या अपघातामध्ये जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा मृत्यू झाला होता. (Ali Akbar to become Hindu)
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार अकबर यांनी सांगितले की, इस्लामच्या वरिष्ठ नेत्यांनीही या बहादूर सेनापतीचा अपमान करणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांचा विरोध केला नाही. त्यांनी सांगितले की, ही बाब स्वीकार करता येऊ शकत नाही. या सर्व प्रकारामुळे माझा या धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी बुधवारी यासंबंधीचा एक व्हिडीओ फेसबूकवरसुद्धा शेअर केला होता.
यामध्ये त्यांनी सांगितले की, आज मी जन्मापासून मिळालेल्या या ओळखीचा त्याग करत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही आहे. मी एक भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो स्मायली इमोटिकॉन्स शेअर केले आहेत. अनेक मुस्लिम युझर्सनी त्यांच्या या पोस्टचा विरोध केला. तसेच त्यांच्यासाठी अपशब्दांचाही वापर केला. दरम्यान, अनेक युझर्सनी त्यांना पाठिंबाही दिला. मात्र काही वेळाने फेसबूकवरून ही पोस्ट गायब झाली होती.
अजून एका पोस्टमध्ये अकबर यांनी लिहिले की, सीडीएस रावत यांच्या मृत्यूनंतर हसणाऱ्या लोकांची देशाने ओळख केली पाहिजे. तसेच त्यांना शिक्षा दिली पाहिजे. सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कृत्ये सुरू असतात. तसेच रावत यांच्या मृत्यूवरून हसणे याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी सांगितले की, बहुतांश लोक जे स्मायलिंग इमोटिकॉन्ससह कमेंट्स करत आहेत. तसेच रावत यांच्या मृत्यूवरून आनंद साजरा करत आहेत, ते विशिष्ट्य धर्माचे आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, रावत यांनी पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात अनेकदा कठोर कारवाया केल्या, त्यामुळे त्यांनी असे केले असावे. असल्या पोस्ट पाहूनही कुठल्याही वरिष्ठ मुस्लीम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही.