प्रख्यात उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. आज एका पत्रकाच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी माझ्यासाठी ही दिवाळी आधीसारखी राहणार नाही, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी एक्सवर व्यक्त केली आहे.
रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी लिहिले की, ही दिवाळी आधीच्यांसारखी असणार नाही. पती-पत्नी म्हणून आम्ही ३२ वर्षे एकत्र राहिलो. आई-वडील म्हणून पुढे गेलो. नेहमी एकमेकांसाठी उर्जेचा स्रोत बनलो. आम्ही कटिबद्धता, संकल्प आणि विश्वासासह प्रवास केला. आमच्या जीवनात अपत्यांच्या रूपात दोन सर्वात सुंदर भाग आले.
त्यांनी पुढे लिहिलं की, नवाज आणि मी इथून पुढे वेगवेगळ्या वाटेने जाणार आहोत. मी त्यांच्यापासून विभक्त होतोय. मात्र आमचे दोन अनमोल हिरे असलेल्या निहारिका आणि निसासाठी जे काही सर्वात चांगलं असेल ते आम्ही करत राहू. आमच्या कुटुंबाच्या आसपास खूप अफवा आणि चर्चा सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमधून दावा करण्यात आला होता की, गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांना गेल्या आठवड्यात ठाणे येथे गौतम सिंघानिया यांच्या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. नवाज मोदी सिंघानिया यांना पार्टीत जाण्यापासून रोखतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नवाज मोदी सिंघानिया यांनी आपल्याला पार्टीला निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र पार्टीच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप केला होता.