एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : बिहारच्या जगप्रसिद्ध ‘मिथिला’ चित्रकलेने रेल्वेच्या सर्व ट्रेन सुशोभित होत आहेत. या चित्रकलेने सुशोभित करण्यात आलेली ‘बिहार संपर्क क्रांती’ एक्स्प्रेस पाहून प्रवासी हरखून गेले. नवी दिल्लीहून दरभंगाकडे शुक्रवारी रवाना झालेल्या या एक्स्प्रेसचा प्रत्येक डबा या चित्रशैलीतील विविध आकर्षक चित्रांनी सुशोभित करण्यात आला आहे. या चित्रांतील नैसर्गिक सौंदर्य चित्ताकर्षक असून, विविध चित्रांच्या माध्यमातून प्रवाशांना अनेक संदेशही देण्यात आले आहेत. ग्रामीण जीवन, वाहतूक यंत्रणा, नद्या, फळांनी लगडलेले वृक्ष, जंगल आदी चित्रांतून बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, हुंडा प्रथेचे उच्चाटन आणि वृक्षारोपणाचा संदेश या चित्रांतून देण्यात आला आहे. विविध चित्रांनी नटलेली ही एक्स्प्रेस प्रवाशांनाही मनापासून भावली.
मिथिला चित्रशैलीने ही एक्स्प्रेस सुशोभित करण्यासाठी ३० कलाकारांना चार दिवस लागले. या स्वच्छता आणि सौंदर्य या उपक्रमातून मिथिला चित्रकलेच्या प्रचाराने या प्राचीन कलेला नवीन ओळख मिळेल, असे रेल्वेच्या उत्तर विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन चौधरी यांनी सांगितले.ग्रामीण जीवन, वाहतूक यंत्रणा, नद्या, फळांनी लगडलेले वृक्ष, जंगल आदी चित्रांतून बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, हुंडा प्रथेचे उच्चाटन आणि वृक्षारोपणाचा संदेश.