रेडिओवरील भारदस्त आवाज, बिनाका गीतमाला फेम आकाशवाणीवरील प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांचं आज निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. सयानी यांचे पुत्र रजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुरोजा दिला आहे.
अमीन सयानी यांच्या मृत्यूबाबत माहिती देताना रजिल सयानी यांनी सांगितले की, अमीन सयांनी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना त्वरित एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अमीन सयानी यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. कारण आज त्यांचे काही नातेवाईक मुंबईमध्ये अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. अमीन सयानी यांच्यावरील अंत्यसंस्काराबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल.
अमीन सयानी यांचा जन्म २१ डिसेबर १९३२ रोजी मुंबईत झाला होता. अमीन सयानी यांनी भारतीय रेडिओच्या जगतामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली होती. आकाशवाणीच्या उत्कर्षाच्या काळात अमीन सयानी यांच्या आवाजाच्या जादूने श्रोत्यांवर भूरळ घातली होती. अमीन सयानी यांनी रेडिओ निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणी, मुंबईमधून केली होती. त्यांनी इथे त्यांनी १० वर्षांपर्यंत इंग्लिश कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर अमीन सयानी यांनी भारतामध्ये आकाशवाणीला लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमीन सयानी यांचं निवेदन असलेला बिनाका गीतमाला हा कार्यंक्रम खूप लोकप्रिय ठरला होता.