देशातील प्रख्यात शास्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते अग्नी क्षेपणास्त्राच्या पहिल्या योजनेचे संचालक होते. लोक त्यांना आदराने अग्नी अग्रवाल किंवा अग्निमॅन या नावाने संबोधत असत.
डॉ. अग्रवाल एएसएलच्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी अग्नी क्षेपणास्राच्या योजनेचं काम जवळपास दोन दशके यशस्वीपणे चालवलं होतं. त्यांनी क्षेपणास्त्रांच्या वॉरहेडची री एंट्री, कंपोझिट हिट शिल्ड, बोर्ड पोपल्शन सिस्टिम, गाइडन्स आणि कंट्रोल यावर स्वत: भरपूर मेहनत घेतली होती.
डॉ. अग्रवाल यांच्या निधनामुळे डीआरडीओमध्ये शोकाचं वातावरण आहे. माजी डीआरडीओ प्रमुख आणि मिसाइल सँटिस्ट डॉ. जी. सतीश शर्मा यांनी सांगितलं की, भारताने एक महान शास्त्रज्ञ गमावला आहे. त्यांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं विकसित करण्यामध्ये आणि त्यांची लॉन्च फॅसिलिटी विकसित करण्यामध्ये खूप मदत केली होती