इंदौर - कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. आता, प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे.
राहत यांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळताच, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, इंदौरमध्ये, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर शायर राहत इंदोरी यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ अपलोड करत नागरिकांनी आवाहन केलं होते. डॉक्टर, पोलीस हे सर्व आपले मदतगार आहेत. जर, आपण त्यांची मदत केली, तरच उद्या वेळ आपल्या मदतीला येईल, असे भावूक आवाहन डॉ. राहत इंदोरी यांनी केलं होतं. तर, कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचं कामही ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन करत आहेत.