पाटणा : प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बिहारमधील चंपारणमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या मनीष कश्यप यांनी गुरुवारी दिल्लीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी मनीष कश्यप यांनी भाजपामध्ये जाण्याचे कारणही सांगितले.
भाजपा नेते मनोज तिवारी म्हणाले की, मोदीजींच्या कामामुळे आणि विकासाने प्रभावित होऊन मनीष कश्यप हे भाजपामध्ये येत आहेत. मनीष कश्यप यांनी आपल्या कारकिर्दीत लोकांचे प्रश्न मांडले. मोदीजींच्या समर्थनार्थ बोलले आणि सार्वजनिक समस्याही मांडल्या. मनीष कश्यप यांना बिगरभाजपा सरकारांनी त्रास दिला, पण भाजपाने त्यांना वाईट काळातही साथ दिली.
पुढे मनोज तिवारी म्हणाले की, वाईट काळातही मी मनीष कश्यप आणि त्याच्या कुटुंबासोबत होतो. मनीष कश्यप 9 महिने तुरुंगात राहिले, मी त्यांच्या घरी गेलो. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या अशा लोकांच्या पाठीशी भाजपा आहे. मनीष कश्यप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण आता तो आमच्या पक्षात सामील झाला आहे, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.
भाजपात सामील झाल्यानंतर मनीष कश्यप यांनी थोडक्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी, "आई मोदीजींचे व्हिडिओ पाहत असते. आईचा आदेश होता की, तू पंतप्रधानांचे हात मजबूत कर, मी तुला मोदीजींच्या स्वाधीन करते", असे मनीष कश्यप म्हणाले. तसेच, "माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी जगातील सर्वात मोठ्या पक्षात आहे, माझ्याकडे शब्द नाहीत, जय श्री राम", असेही मनीष कश्यप म्हणाले. दरम्यान, मनीष कश्यप भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा अनेक दिवसांपासून सुरू होती. भाजपा नेते मनोज तिवारी यांच्या भेटीनंतर हे जवळपास निश्चित झाले होते.