- बाळासाहेब बोचरे
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या दर्दभऱ्या आवाजाचे शौकीन जगभर सापडतात पण त्यांच्या गाण्यावर आणि आवाजावर फिदा झालेला एक अवलिया चाहता गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहतो. त्याने चक्क रफी यांचे मंदिर बांधले असून विश्वात असे एकमेव मंदिर आहे.
उमेश माखिजा असं त्या चाहत्याचं नाव. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून गुजरात मध्ये स्थाईक झालेल्या सिंधी माखिजा कुटुंबांमध्ये उमेशचा जन्म झाला. घरामध्ये सगळेच चित्रपटाचे शोकीन. चार भावंडापैकी कोण देव आनंदचा तर कोण गुरुदत्त चा चाहता . आई वडील दिलीप कुमार आणि शम्मी कपूरचे चाहते होते. उमेश च्या मनावर मात्र रफी यांच्या गाण्याने आणि आवाजाने जादू केली होती. मधुबन मे राधिका नाचे रे हे गाणं इतक आवडलं की पुढे रफींची गाणी ऐकण्याचा त्यांना छंद जडला. तेव्हापासून रफींच्या गाण्यांच्या तबकड्या त्यांनी जमा करण्यास सुरुवात केली. तीन खोल्यांच्या घरात दाटीवाटीने राहणाऱ्या या कुटुंबामध्ये उमेश एका कपाटांमध्ये रफींच्या गाण्यांचा संग्रह सुरू केला. पुढे कॅसेट्स व्हीसीडी सीडी डीव्हीडी अशा रूपांतरित साधनांचा संग्रह वाढतच गेला. आज त्यांच्याकडे साडेचार हजाराहून अधिक गाण्यांचा संग्रह आहे. या संग्रहाला घरातील कोणीही विरोध केला नाही गारमेंट व्यवसायात असलेल्या या कुटुंबाची प्रगती झाली आणि त्यांनी कालांतराने मोठे घर घेतले आणि रफींच्या संग्रहाला चांगली जागा मिळाली.
जुलै 1980 मध्ये रफी नावाचा आवाज अंतरात्म्यात विलीन झाल्यानंतर त्यांच्या गाण्याचा शोध माखिजानी सुरू केला. मिळेल तिथून ती मागवून घेतली. 1984 पासून संग्रह करत असलेल्या माखिजा यांना भरपूर गाणी सापडली. त्यामध्ये हिंदी मराठी भजने प्रेम गीते शास्त्रीय गीते, कव्वाली अशा कितीतरी गाण्यांचा समावेश आहे, आता कपाटाऐवजी रफीच्या संग्रहासाठी एक खोली केली आहे. त्या खोलीमध्ये रफींच्या गाण्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग दाखवणारी छायाचित्रेही चिटकवली आहेत. रफीसाठी खास देव्हारा बनवला आहे. दररोज सकाळी अंघोळ करून आपले दैवत झुलेलाल आणि त्यानंतर रफी यांच्या प्रतिमेसमोर आरती करून नतमस्तक होतात.
रफींच्या आवाजातील गाणी हीच आपल्यासाठी भजने आहेत. ही गाणीच दिवसभर स्फूर्ती देतात , असे ते म्हणतात. रात्री आल्यानंतर शुचिर्भूत होऊन मंदिरात जातात आरती करून मंदिरातच गाणी ऐकल्यानंतर मग जेवण करून झोपतात. माखिजा यांनी ज्या ठिकाणी रफीचे मुंबईत दफन करण्यात आले त्याठिकाणची मातीही आपल्या संग्रही ठेवली असून ती ते दररोज कपाळी लावतात. पूजेच्या कामांमध्ये त्यांचा नातू एतांश व मुलीचा मुलगा दानिश ही लहान मुले मनापासून मदत करतात. पत्नी पुनम आणि मुलगी आरती ही मंदिराची देखभाल करतात. या मंदिराची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली असून देश-विदेशातून चाहते मंदिराला भेट देण्यासाठी येतात. विशेषतः सुट्टीच्या दिवशी दरबारच भरतो. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया इथून चाहते भेट देऊन गेले आहेत. देशभरातून तर नेहमीच चाहते येतात. हिंदी आणि गुजराती चित्रपटातील कलाकारांनी अनेक वेळा या मंदिराला भेटी दिल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याने देव्हाऱ्याजवळच्या तीन खोल्या त्यांनी पडल्या असून ती जागा भक्तांसाठी मोठा हॉल म्हणून तयार केली आहे. स्वतः माखिजा आता शेजारच्या फ्लॅटमध्ये रहायला गेले आहेत.
या मंदिराला रफीचे मुंबईतील कुटुंबीय नियमित भेट देतात. एवढेच काय एकमेकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात ही हे कुटुंबीय एकत्र येतात. रफींचा संग्रह करण्याकामी मुंबईचे संजीव रजपुत सुरेन्द्रनगर गुजरात चे सलीम खान पठाण अहमदाबादचे इकबाल मंसुरी यांची मोलाची मदत झाल्याचे माखिजा मान्य करतात.
साधू संतांनी केलेली कवणे अथवा अभंग याला जसा अर्थ आहे तसाच गाण्याला सुद्धा आहे. सुखके सब साथी अल्ला तेरे नाम या भक्ती गीता मध्ये केवढा मोठा संदेश दडला आहे. तूने मुझे बुलाया गंगा तेरा पाणी अमृत रामजी की निकली सवारी ही गाणी ऐकताना भक्त डोलायला लागतात.
रफी यांनी गायलेली गाणी ही मनाला तर भावताच पण त्यामध्ये मोठा गर्भित अर्थ आणि उपदेशी लपलेला आहे. त्यामुळे आपणाला जगण्याची उर्मी आणि स्फूर्ती मिळते. आपण रफींच्या आवाजाच्या प्रेमात पडलो एवढच. आज माझ्या उद्योगाच्या बिल बुक वर व पॅकिंगवर रफी यांची गाणी छापलेली असतात. रफी यांच्या गाडीचा क्रमांक एम एम यु 10 67 होता. माखिजा यांच्याकडे असलेल्या सर्व गाड्या याच क्रमांकाच्या आहेत. रफींच्या गाण्याने जशी मनावर जादू केली तशी अनेकवर केलेली आहे पण त्यांच्याकडे ही सर्व गाणी असतीलच असे नाही. अशा चाहत्यांची गाण्यांची तहान भागवण्यासाठी एक गाण्यांची पाणपोई उभारण्याचा आपला माणूस आहे असे उमेश माखिजा यांनी सांगितले.