नवी दिल्ली : भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला गेल्या आठवड्यात नोटीस पाठविल्यानंतर, आता केंद्र सरकारने या प्रकरणी फेसबुकलाही नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सरकारने फेसबुकला पाच प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तरे ७ एप्रिलपर्यंत द्यावीत, असे सांगण्यात आले आहे. भारतीय मतदारांची वैयक्तिक माहिती चोरून, तिचा देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्यात आला आहे का, तसेच या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून काही उपाय योजण्यात आले आहेत का, अशी विचारणा फेसबुककडे केंद्र सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात केंब्रिज अॅनालिटिकाला पाठविलेल्या नोटिशीत केंद्र सरकारने त्या कंपनीला सहा प्रश्न विचारले होते. भारतीयांचीचोरलेली वैयक्तिक माहिती कोणत्या कारणांसाठी व कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांकरिता वापरली गेली, त्यांची नावे कळवा, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.२०१०च्या बिहार निवडणुकांसाठीजनता दल (यू) या पक्षासाठी मतदारांसंदर्भातील माहिती मिळवून देण्याचे काम, केंब्रिज अॅनालिटिकाने केले होते, असे या कंपनीतील माजी कर्मचारी ख्रिस्तोफर वायली याने बुधवारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. केंब्रिज अॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएलने उत्तर प्रदेशमधील जातीनिहाय केलेल्या सर्वेक्षणाची माहितीही या पक्षाने विकत घेतली होती, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, वायलीने केलेल्या दाव्याचा जनता दल (यू)ने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.केंब्रिज अॅनालिटीकाला एका भारतीय-अमेरिकी अब्जाधीशाने निधी पुरविला होता. भारतात काँग्रेसचा पराभव व्हावा, अशी या अब्जाधीशाची इच्छा होती, असा नवा दावा ख्रिस्टोफर वायली याने आपल्या जबाबात केला आहे.
फेसबुकला केंद्र सरकारने विचारले प्रश्न; भारतीयांच्या डेटाचा गैरवापर झाला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:46 AM