हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे. त्यामुळे १५ राज्यांतील ५७ जागांसाठीच्या निवडणुकीनंतर भाजप राज्यसभेत शंभराचा आकडा गाठू शकलेला नाही; तर, सभागृहात काँग्रेसची सदस्यसंख्या ३० आहे.
गत सहा दशकांत राज्यसभेत कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपला हेही शक्य झाले नसते. मात्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मोठ्या प्रयत्नांनी तीन जागा जिंकून हा आकडा गाठता आला आहे.
अर्थात, तीन जागा कमी झाल्या असल्या तरी पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. राजस्थानातील एक जागेच्या नुकसानीमुळे पक्षनेतृत्व नाराज आहे. नामनिर्देशित सात संसद सदस्यांनी पक्षात प्रवेश केला तरी भाजप १०० चा आकडा गाठू शकत नाही. २४५ सदस्यीय सभागृहात सात जागा रिक्त आहेत.
आपने सातही जागा जिंकल्या-आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मोठे यश मिळविले. राज्यसभेच्या सर्व सात जागा जिंकल्या आणि दहाचा आकडा गाठला आहे. - तृणमूलच्या १३ जागांनंतर ‘आप’ हा १० जागा जिंकणारा तिसरा राष्ट्रीय पक्ष आहे. चौथा पक्ष द्रमुककडे १० जागा आहेत.
अकाली शून्यावर, बसप अवघी एक राज्यसभेत अकाली दलाचा एकही सदस्य राहिलेला नाही. तर, बसपाचा एक सदस्य आहे. सपाची संख्या कमी होऊन तीन झाली आहे. शिवसेना ३, राष्ट्रवादीचे ४ सदस्य आहेत. आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस ९ सदस्यांसह पाचवा मोठा पक्ष आहे.
माकन यांचा पराभव कुणामुळे?हरयाणाच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अजय माकन ०.६ मतांनी पराभूत झाले. बीजेपी-जेजेपी समर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. अजय माकन यांच्या पराभवामुळे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित होत आहेत.
भाजपचा गड अभेद्य राहिला नाहीनिकाल पाहिल्यानंतर भाजपचा निवडणूक गड अभेद्य राहिला नसल्याचे समोर येते. भाजप समर्थित उमेदवार विजय मिळवू शकले नाहीत. विरोधकांतील एकजूट समोर येत असतानाच पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.