नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. संसदेत या कृषी विधेयकांना विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएमधील काही घटक पक्षांनी विरोध दर्शविला. तरीही ही कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी 'भारत बंद 'ची हाक दिली होती.
भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर आता मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना समोर आली आहे. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे. ट्रॅक्टरला आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी पाच जणांना घेतलं ताब्यात
ट्रॅक्टरला आग लावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनजोत सिंग, रमनदीपसिंग सिंधू, राहुल, साहिब आणि सुमित अशी आरोपींची नावं आहेत. ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण हे पंजाब युवा काँग्रेसचे नेते असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच इंडिया गेट जवळून एक इनोव्हा कारदेखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध
सकाळी साते सातच्या सुमारास जवळपास 15 ते 20 लोक कृषी कायद्याविरोधात इंडिया गेटजवळ जमा झाले. आपल्यासोबत एक जुना ट्रॅक्टर ते घेऊन आले होते. भररस्त्यात ट्रॅक्टर पेटवून त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता
इटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण
करोडो लोकांच्या हितासाठी सरकारचं मोठं पाऊल, National Pension System चे बदलले नियम
"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"
"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"