नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहीद जवांनाचा उल्लेख करुन मत मागितल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला जातो. या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत विरोधकांना प्रतिप्रश्न केला आहे. देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच देशभक्ती आणि शहीदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं.
या मुलाखतीत मोदी म्हणाले की, मागील ४० वर्षापासून देश दहशतवादाशी लढतोय. जर देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत तर त्याला अर्थ काय राहणार? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे.
हजारो भारतीय जवान देशासाठी शहीद होतात, मग हा मुद्दा निवडणुकीत का नको? जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो मग जेव्हा एक जवान देशासाठी शहीद होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना तुमचं पहिलं मत हे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करा असं आवाहन जाहीर व्यासपीठावरुन केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. शहीद जवानांच्या नावाचा वापर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करुन याचं राजकारण करत असल्याचा आरोप केला जात होता त्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे.
वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमध्ये भाषण करताना नवीन मतदारांना केलेल्या आवाहनावर विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हिडीओ तपासला जात असून प्रथमदर्शनी नरेंद्र मोदी यांनी केलेलं वक्तव्य हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारात भारतीय सैन्य दलाचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हे पाहणे गरजेचे आहे.