बिहारमध्ये विधानसभा निवडणूक असली तरी मध्य प्रदेशमध्येही 28 जागांवर पोटनिवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केल्याने येथे सत्तांतर झाले होते. यामुळे कमलनाथ सरकारला पायउतार व्हावे लागले होते. शिंदे यांच्या प्रचारसभेवेळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तरीही भाजपाच्या नेत्यांनी आणि नंतर शिंदे यांनी भाषण सुरु ठेवल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. त्याचा प्रचार करण्यासाठी शिंदे गेले होते. शिंदे येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे चालू होती. दरम्यान, पंढना येथील भाजपचे आमदार राम डांगोरे भाषण देत होते, त्यावेळी 80 वर्षीय शेतकरी जीवनसिंग यांचा अचानक मृत्यू झाला.
कमलनाथ यांची जीभ घसरली, भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना म्हणाले,'आयटम'!, Video Viral
शेतकऱ्याचा मृत्यू होताच आजुबाजुच्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. तरीही नेत्यांचे भाषण थांबले नाही. थोड्याच वेळात शिंदेदेखील त्याठिकाणी पोहोचले. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्याचा मृतदेह सभास्थळापासून नेण्यात आला होता. जेव्हा शिंदे यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्याला श्रद्धांजली दिली आणि एक मिनिटाचे मौन ठेवले. यानंतर भाषण सुरु केले. काँग्रेसने यावर टीका केली आहे.
शिंदे यांच्या सभेमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू दुर्लक्षून सभा सुरुच ठेवण्यात आली. यामुळे आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसने व्हिडीओ पोस्ट करून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्याचा भर सभेत मृत्यू झाला तरीही सभा पुढे सुरु का ठेवली, असा सवाल विचारला आहे. शेतकऱ्याच्या मृतदेहासमोर बेशरम भाजपा टाळ्या वाजवत राहिली, अशी टीका केली आहे.
यावर शिंदे यांनी काँग्रेसला प्रत्यूत्तर देत म्हटले काँग्रेस नेहमीसारखीच संवेदनशील मुद्द्यांवर घाणेरडे राजकारण करत आहे. मी रॅलीमध्ये पोहोचण्याआधीच अन्नदात्याचा मृत्यू झाला. कार्यकर्त्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले. सभस्थळी गेल्यानंतर मला याची माहिती मिळाली. यामुळे मी श्रद्धांजली अर्पण केली, असे शिंदे म्हणाले.