नवी दिल्ली - कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. एका गरीब शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. 200 रुपये भाडयावर घेतलेल्या जमिनीत शेतकऱ्याला तब्बल 60 लाखांचा हिरा सापडला आहे. लखन यादव असं हिरा सापडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन यादव या शेतकऱ्याने पन्नामध्ये 200 रुपये भाडयावर 10 बाय 10 जमिनीचा एक छोटा तुकडा घेतला होता. तिथे खोदकाम करताना त्याला 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. खाणीत सापडलेला हिरा लिलावामध्ये 60.6 लाख रुपयांना विकला गेला आहे. "हिऱ्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. हिरा सापडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही" असं लखन यादव याने म्हटलं आहे.
पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध
लखनने मिळालेल्या पैशातून आपल्या चार मुलांना चांगले शिक्षण देण्याचा विचार केला आहे. माझे शिक्षण झालेले नाही. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.
खाणीत सापडले मौल्यवान हिरे अन् क्षणातच मजूर झाले मालामाल
हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना काही दिवसांपूर्वी मौल्यवान हिरे सापडले होते. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा एक हिरा मिळाला होता. पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले आहे. हिऱ्याची योग्य किंमत अधिकाऱ्यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.