नाशिक: कांद्याला प्रति किलोमागे जेमतेम दीड रुपयाचा भाव मिळाल्यानं मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यानं ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवली आहे. कांद्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या दराचा निषेध म्हणून त्यांनी ही रक्कम पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. संजय साठे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. साठे यांनी त्यांच्या शेतातला 750 किलो कांदा विक्रीसाठी नेला होता. त्यातून चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र त्यांना फक्त 1 हजार 64 रुपये मिळाले. नाशिकच्या निफाडमध्ये राहणाऱ्या संजय साठे यांनी शेतातला 750 किलो कांदा विक्रीसाठी नेला. 'मी या हंगामात 750 किलो कांद्याचं उत्पादन घेतलं. मात्र निफाडच्या घाऊक बाजारात एक किलो कांद्यासाठी फक्त 1 रुपयाचा भाव दिला जात होता. त्यामुळे मी कशीबशी घासाघीस केली. त्यामुळे एक किलो कांद्याला 1.40 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे 750 किलो विकून मला 1 हजार 64 रुपये मिळाले,' अशी व्यथा साठे यांनी मांडली. गेले चार महिने मेहनत करुन कांद्याला इतका कमी दर मिळाल्यानं प्रचंड दु:ख झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.कांदा विकून मिळालेली रक्कम निषेध म्हणून पंतप्रधान कार्यालयाला पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. 'पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन निधीला मी 1 हजार 64 रुपये पाठवून दिले. त्यासाठी मला आणखी 54 रुपयांचा खर्च आला', अशी माहिती त्यांनी दिली. 'मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. मी एक साधा शेतकरी आहे. मात्र सरकारला आमच्या त्रासाबद्दल काहीच वाटत नाही, याचं अतिशय वाईट वाटतं,' असं साठे म्हणाले.
750 किलो कांद्याच्या विक्रीतून फक्त 1,064 रुपये; शेतकऱ्यानं मोदींना पाठवली 'कमाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:51 PM