नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली. संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित अनेक संघटनांनी मिळून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे.
बुधवारी पत्रकार परिषदेत राकेश टिकैत यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शेतात काम करू नये. अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात काम करत नाहीत. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी अमवास्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये. दुकानेही बंद ठेवण्याची विनंती आहे. यामध्ये एमएसपी, नोकरी, अग्निवीर, पेन्शन आदी मुद्दे मांडले जाणार आहेत. तसेच, वाहतूकदारांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी निवेदन जारी करून १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केली होती. या संघटनांनी एमएसपीवर पीक खरेदीची हमी द्यावी, अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबांची कर्जमाफी आणि कामगारांना किमान २६ हजार रुपये प्रति महिना वेतन मिळावे अशी मागणी या संघटनांनी केली आहे. दरम्यान, २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते.