मागच्या जवळपास वर्षभरापासून पंजाब आणि हरयाणामधील सीमेवर तळ ठोकून असलेले आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आता काही बाबींवर मतैक्य होताना दिसत आहे. २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी वैद्यकीय उपचार घेण्याची उपचार घेण्याची तयारी दर्शवली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारच्या एका प्रतिनिधीने शनिवारी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. तसेच मागण्यांवरील चर्चेसाठी पुढच्या महिन्यात चंडीगड येथे निमंत्रित केले. त्यामुळे आता लवकरच दिल्ली-पंजाब राष्ट्रीय महामार्ग खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असं झाल्यास हजारो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या संयुक्त सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने डल्लेवाल यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. बैठकीनंतर प्रिया रंजन यांनी एक प्रस्ताव वाचला, त्यामध्ये डल्लेवाल यांना त्यांचं आमरण उपोषण संपवण्याची विनंती करण्यात आली. तसेच शेतकरी नेत्यांना १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाचता चंडीगडमधील सेक्टर-२६मध्ये महात्मा गांधी लोकप्रशासन संस्थानामध्ये एका बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले. हे निमंत्रण डल्लेवाल यांच्यासह एसकेएम (एनपी) आणि केएमएमचे समन्वयक सरवर सिंह पंधेर यांना देण्यात आलं आहे.
प्रिया रंजन यांनी सांगितले की, आम्ही डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंतीत आहोत. दोन्ही मंचांचे नेते आणि डल्लेवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने केंद्री मंत्री आणि पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. डल्लेवाल यांनी याबाबत सांगितले की, जर आमरण उपोषण करत असलेल्या १२१ शेतकऱ्यांनी मला सांगितले तर मी उपचार घेईन. मात्र जोपर्यंत एमएसपीला कायदेशीर हमी मिळत नाही तोपर्यंत मी भोजन घेणार नाही. त्यानंतर त्वरित उपोषण करत असलेल्या १२१ शेतकऱ्यांनी डल्लेवाल यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यानंतर डल्लेवाल यांनीही उपचार घेण्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.