लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: शेतकऱ्यांना किमान हमी भावासाठी (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, यासाठी इंडिया आघाडी केंद्र सरकारवर दबाव आणणार असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले, त्यांची शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी संसद संकुलात भेट घेतली. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटकमधील शेतकरी नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग, काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधवा, गुरुजितसिंग औजला, धरमवीर गांधी, अमरसिंग, दीपेंदरसिंग हुडा, जयप्रकाश हे उपस्थित होते. या शिष्टमंडळात १२ शेतकरी नेत्यांचा समावेश होता.
'शेतकरी नेत्यांना विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात जाण्यास प्रतिबंध'शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात आम्ही चर्चेसाठी बोलाविले होते; पण त्यांना तिथे येऊ देण्यास सरकारी यंत्रणेने प्रतिबंध केला आहे. कदाचित ते शेतकरी असल्याने असा पवित्रा घेण्यात आला असावा, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
तरुणांना खोटी आश्वासने दिली गेली"तरुणांना खोटी आश्वासने देण्यात आली." अशी टीका सपा खासदार जया बच्चन यांनी केली. 'उत्तर प्रदेशबाबत भेदभाव केला जात आहे. त्यांनी नोकऱ्या हिसकावून घेतल्या आणि आता शिकाऊ उमेदवारीबद्दल बोलत आहेत, अशी टीका सपा प्रमुख अखिलेश यादव यानी केली.