नवी दिल्ली : उद्या दिल्लीतील जंतर मंतरवर होणारे शेतकरी आंदोलन तापण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनापूर्वी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राकेश टिकैत हे उद्या दिल्लीतील जंतर मंतरवर शेतकरी संघटनांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. दिल्ली-हरियाणा टिकरी बॉर्डवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत.
उद्या म्हणजेच 22 ऑगस्टला शेतकऱ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी शेतकरी देशाच्या राजधानीत येत आहेत. लखीमपूर खेरी येथे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहेत. तसेच, ज्या मागण्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, ते लवकर पूर्ण करावे, अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांना दिल्ली पोलिसांनी मधु विहार पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात राकेश टिकैत यांनी ट्विट केले आहे. 'सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे दिल्ली पोलीस शेतकऱ्यांचा आवाज दाबू शकत नाहीत. या अटकेमुळे नवी क्रांती होणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे' असे राकेश टिकैत यांनी ट्विट करत #थांबणार नाही #थकणार नाही # झुकणार नाही, असा हॅशटॅश दिला आहे.
याआधी संयुक्त किसान मोर्चाने 18 ऑगस्टपासून उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी प्रकरणासंदर्भात 75 तासांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हेही सहभागी झाले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची बडतर्फी आणि टिकुनिया हिंसाचार प्रकरणी तुरुंगात डांबलेल्या शेतकर्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहेत.