नवी दिल्ली - भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिकैत हे सोमवारी आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील काय़? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर दिलं आहे.
"त्यांना (योगी) पंतप्रधान बनवा... हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशसाठी कोणतं सरकार चांगलं आहे असा प्रश्न विचारला असता टिकैत यांनी जर आंदोलन मजबूत झालं तर सर्व सरकार चांगलं काम करतील असं म्हटलं आहे. याआधी राकेश टिकैत यांनी यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान दिले आहे.
"योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"
यासोबतच त्यांनी राम मंदिराबाबतही महत्त्वाचं विधान केलं. न्यूज18 इंडियाच्या एका कार्यक्रमात राम मंदिरावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राकेश टिकैत यांनी दुसरे मंदिर का बांधले पाहिजे. त्या ऐवजी शाळा, रुग्णालये का बांधली जात नाहीत? असं म्हटलं आहे. यासोबत भाजपा आपल्या पक्षाच्या निधीतून मंदिर बांधत आहे का? गावोगावी मंदिरे बांधलेली आहेत असंही म्हटलं आहे. टिकैत यांनी मुख्यमंत्री योगींना रूग्णालये बांधण्याचे काम करण्यास सांगितले. "बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, निरीक्षक भरतीसाठी उमेदवार रस्त्यांवर लाठ्या-काठ्या खात आहेत. त्यांची विवाह मोडली आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने काम करावे."
"मथुरा मुझफ्फरनगर होऊ देऊ नका"
"मंदिरं गावातील लोक देणगी जमा करून बांधतात. सर्व धार्मिक स्थळे बांधली जात आहेत. विकास करणे हे सरकारचे काम आहे. मंदिर, मशीद, जिना आणि हिंदू-मुस्लिम हे मुद्दे मत मिळवण्याचे काम करतात" असं म्हटलं आहे. कोणताही राजकीय पक्ष या गोष्टींचा वापर करून त्याद्वारे आपली मतं शोधतो तर, आधीच्या सरकारांमध्ये कैराना आणि मुझफ्फरनगर दंगली झाल्या तेव्हा तुम्ही बोलला नाही का? या प्रश्नावर टिकैत म्हणाले की आम्ही फक्त एवढेच सांगितले होते की मथुरा मुझफ्फरनगर होऊ देऊ नका. योगी मथुरेतून निवडणूक लढवणार? या प्रश्नावर बोलताना टिकैत हसले आणि म्हणाले की, "त्यांनी मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवली तर बरे होईल आणि स्वबळावर लढावे, पक्षाच्या बळावर कशाला लढता."