भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत हे शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राकेश टिकैत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यमुना एक्स्प्रेवेवर पुढे जाण्यापासून रोण्यात आल्यानंतर टिकैत यांना टप्पल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. राकेश टिकैत यांना केवळ ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, असे पोलिसांच्या एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले आहे.
या कारवाईबाबत राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस शेतकऱ्यांना आपापल्या घरात राहण्यास सांगून त्यांना गौतमबुद्धनगर, नोएडा आदी भागात जाण्यापासून रोखत आहेत. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला कधीपर्यंत ताब्यात ठेवणार आहात. तुम्ही आम्हाला कोंडून ठेवलं तर तुम्ही बोलणार कुणाबरोबर? अधिकाऱ्यांची हीच भूमिका कायम राहिली. तर शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होईल.
भारतीय किसान युनियनने मंगळवारी नरेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली मुझफ्फरनगर मधील सिसौली गावातील किसान भवन येथे एक आपातकालीन बैठक बोलावण्यात आली होती.. तसेच जमिनीची मोबदल आणि इतर मागण्यांसाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.