Farmers Protest Latest News: शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरियाणा आणि दिल्लीतील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मंगळवार(दि.13) रोजी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. या सीमांवर काँक्रीटचे स्लॅब, रस्त्यावर टोकदार खिळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. यावरुन आम आदमी पक्षाने (AAP) केंद्र आणि हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सिंधू सीमेसह बहुतांश जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यावरुन आपने सरकारवर बोचरी टीका केली. "शेतकऱ्यांची इतकी भिती का? शेतकरी युद्ध लढायला नाही, आपला हक्क मागायला येत आहेत," असे आपने म्हटले आहे.
दिल्लीत अशी सुरक्षा व्यवस्था'दिल्ली चलो' मोर्चाला लक्षात घेऊन दिल्लीपासून हरियाणापर्यंतच्या सीमेवर नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सीमा बंद केल्याचीही माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर कलम 144 लागू केले आहे. दिल्लीला हरियाणा आणि यूपीशी जोडणाऱ्या तिन्ही प्रमुख सीमांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. या सीमांचे किल्ल्यात रुपांतर झाले आहे.
राजधानीत 1 महिन्यासाठी कलम-144दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू केले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा म्हणाले की, किसान मोर्चाच्या दिल्ली चलो मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे. या अंतर्गत लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारची निदर्शने आणि रॅली काढण्यास बंदी असेल. सीमेवरून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या प्रवेशावरही बंदी असेल. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.