Farmer Protest India: पुन्हा एकदा शेतकरी राजधानी दिल्लीकडे मोठ्या संख्येने कूच करत आहेत. शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. माहितीनुसार, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांचा एक गट सीमेच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातून आणि वाहने जाऊ शकत नाहीत अशा रस्त्यांवरून पायी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंजाबमधील शेतकरी १५०० ट्रॅक्टर आणि ५०० हून अधिक वाहनांसह दिल्लीला रावाना झाले आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रॅक्टरमध्ये जवळपास ६ महिन्यांचे रेशन शेतकऱ्यांनी सोबत ठेवले आहे.
दरम्यान, मागील वेळी देखील शेतकरी दीर्घ नियोजन करून दिल्लीला गेले होते. खरं तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापूर्वी KMSC ची कोअर कमिटी आणि मोठे शेतकरी नेते केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि तामिळनाडूलाही गेले होते. याशिवाय येथील शेतकरी संघटनांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रसंगी पोलिसांशी संघर्ष झाल्यास कशी काळजी घेता येईल यासाठीही शेतकऱ्यांनी विशेष तयारी केली. दिल्ली मार्च दरम्यान शेतकऱ्यांनी 'होम स्टे'च्या धर्तीवर ट्रॅक्टर आणि ट्रॉली तयार केल्या आहेत, जेणेकरून संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास, शेतकरी आंदोलनस्थळी दीर्घकाळ टिकून राहू शकतील. शेतकरी संघटनेच्या रणनीतीचा एक भाग म्हणून त्यांचा एक छोटा गट दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करेल. ते दिल्लीतील धर्मशाळा, अतिथीगृहे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ते वास्तव्य करतील.