चंडीगड : पंजाब - हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलकांनी त्यांचे ‘चलो दिल्ली’ आंदोलन पुन्हा सुरू केले. शंभू आणि खनौरी येथे बॅरिकेट्सचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि चष्मा घातलेले दिसले.त्यात एक शेतकरी ठार झाला आणि १२ पोलिस जखमी झाल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी मोर्चा दोन दिवस स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी शांतता पाळून चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
जेसीबी, पोकलेन मागे घ्या : हरयाणा पोलिस
हरयाणा पोलिसांनी पोकलेन, जेसीबीच्या मालकांना ते आंदोलनस्थळावरून काढून टाका. कारण, त्यांचा वापर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी होऊ शकतो. तसे न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले
मुझफ्फरनगर : येथील धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.