Farmers Protest 2.0: उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यात शेतकऱ्यांसंबंधी महत्त्वाच्या घोषणांचा समावेश केल्या जाण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच काही शेतकरी संघटनांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी देशभरात ट्रॅक्टर मार्च म्हणजेच मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. सर्व पिकांना किमान हमीभाव या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांबाबत शेतकरी नेत्यांकडून आंदोलनाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लबवर युनायटेड किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चातर्फे ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्यात आली. याशिवाय शेतकरी संघटनांनी १ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करणार असल्याचे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर शेतकरी निदर्शने करणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी आंदोलनाला २०० दिवस पूर्ण होतील, त्यानिमित्त सर्व शेतकरी सीमेवर जमतील, असेही शेतकरी नेत्यांनी सांगितले. शंभू सीमा आणि इतर सीमा उघडल्यावर शेतकरी दिल्लीकडे कूच करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
असा असेल शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण कार्यक्रम
- १ ऑगस्टला १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांवरील हिंसाचारात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाला विरोध
- १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल.
- ट्रॅक्टर मोर्चासोबत नवीन फौजदारी कायद्याची प्रत जाळली जाईल.
- हरयाणाच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सर्व राज्यांतील शेतकरी तेथे पोहचतील
- ३१ ऑगस्टला १३ फेब्रुवारीच्या आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त निदर्शने
- १ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील संभल येथे शेतकऱ्यांची रॅली निघेल
- सप्टेंबर महिन्यात १५ सप्टेंबर रोजी जिंदमध्ये आणि २२ सप्टेंबरला पिपली येथे दोन मोठ्या रॅली होतील