नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रसत्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी आता गृह मंत्री अमित शाह यांनी संदेश दिला आहे. शाह यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.
अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे.
कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत. एवढेच नाही, तर या शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करू देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, सरकारने त्यांना दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना ती मान्य नाही. ते सिंधू बॉर्डरवर आपले आंदोलन करत आहेत.
शाह म्हणाले, भारत सरकारने लवकरात लवकर चर्चा करावी, 3 डिसेंबरपूर्वी चर्चा करावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असेल, तर मी आपल्याला आश्वासन देतो, की आपण निर्धारित ठिकाणी स्थलांतरित होताच, दुसऱ्या दिवशी भारत सरकार आपल्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे शाह म्हणाले.
तसेच आपण रोडऐवजी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी आपले धरणे आंदोलन शांततामय आणि लोकशाही पद्धतीने कराल, तर शेतकरी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही, असेही शाह म्हणाले.