Farmer Protest In Delhi: विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा देत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हरयाणाच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. आता शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून धरल्याने हजारो आंदोलक तेथेच थांबले आहेत. तत्पूर्वी आंदोलकांनी अडथळे भेदून जाण्याचा एक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर परत अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे.
आंदोलक शेतकऱ्यांच्या एका गटाने बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. काही शेतकऱ्यांनी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. आंदोलन कुणीही करू शकते. मात्र, त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही, समस्या येणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.
शेतकरी ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, त्यावर आक्षेप आहे
एखादी मागणी करणे, त्या मागणीसाठी दिल्लीत धरणे देणे हा आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, त्यामागचा हेतूही पाहायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. सीमांवर ताबा मिळवला आहे. या अशा आंदोलनाचा सर्वांना त्रास होत आहे. हे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणे योग्य नाही. ट्रॅक्टर हे प्रवासाचे साधन नाही. शेतकरी बस किंवा ट्रेनमधून येऊ शकले असते. लोकशाही पद्धतीने चर्चा केले गेली पाहिजे, जेणेकरून त्यातून तोडगा निघावा, असे खट्टर यांनी सांगितले.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी आंदोलन आणि समस्या सोडवण्याच्या मार्गावर नवी दिल्लीत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीबाबतचा तपशील लगेच मिळू शकला नाही.