Delhi Chalo March (Marathi News) नवी दिल्ली : पंजाब आणि हरयाणाच्या सीमेवर आंदोलक शेतकरी (Farmer Protest) ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत आमचा दिल्ली चलो मार्च काढण्यात येणार आहे, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी रविवारी सांगितले.
जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, "आम्ही शेतकरी आहोत, पण तरीही पोलिस आमच्यावर गोळीबार करत आहेत. आमचा दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम अद्याप टळलेला नाही, अशा स्थितीत आम्ही दिल्लीला नक्की जाऊ, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्यास सांगू."
याचबरोबर, 10 मार्च रोजी आमचे देशभरात सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत रेल रोको आंदोलन आहे, असेही जगजित सिंह डल्लेवाल म्हणाले. दरम्यान, 13 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना दिल्ली चलो मोर्चा काढण्यापासून रोखण्यात आले होते. तेव्हापासून हरयाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत.
किसान महापंचायत होणारकेंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 14 मार्च रोजी दिल्लीत किसान महापंचायत होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने (SKM) शनिवारी (2 मार्च 2024) सांगितले की, 400 हून अधिक शेतकरी संघटना 'महापंचायत'मध्ये सहभागी होतील. तसेच, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा (KMM) यांना सर्व शेतकरी संघटना आणि संघटनांमध्ये समस्या-आधारित ऐक्याचे आवाहन करणारा ठराव पाठवला आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?पिकांच्या किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, कृषी कर्जमाफी, पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मागे घेणे यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. दरम्यान, याआधी संयुक्त किसान मोर्चाने 2020-21 मध्ये केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले.