नवी दिल्ली : कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली आहे.
किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद करण्यात आले आहे. यावर मोर्चाने मोदी सरकारचे नाव न घेता जेव्हा लोक आवाज उठवतात तेव्हा हे तेच करू शकतात असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर आपली बाजू मांडण्यासाठी तसेच ट्रोलर्सना उत्तरे देण्यासाठी शेतकऱ्यांनीच हे पेज बनविले होते. हा शेतकरी आंदोलकांचा आयटी सेल होता. यावर ६० शेतकरी काम सांभाळत होते.
जिवघेण्या कडाक्याच्या थंडीत सलग २५ व्या दिवशीही कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरुच आहे. उद्या हे आंदोलक शेतकरी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर देशवासियांनी २३ डिसेंबरला एका वेळच्या जेवणाचा त्याग करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याचवेळी दुसरीकडे किसान भवनात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासोबत चर्चेला बसले होते. पत्रकार परिषदेत जोपर्यंत तिन्ही कायदे मागे घेत नाहीत तोवर शेतकरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच सोमवारी २४ तास हे शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर हरियाणातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार असून या दिवसांत वाहनांना टोल फ्री करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
तसेच २३ डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी भारतीयांनी एका दिवसाचा उपवास ठेवावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे.
मन की बात वेळी थाळ्या वाजवणारजगजीतसिंह ढल्लेवाला यांनी सर्व शेतकरी समर्थकांना २७ डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मध्ये बोलतील तेव्हा थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले आहे. जेवढा वेळ मोदी बोलतील तेवढा वेळ थाळ्या वाजवाव्यात असे ते म्हणाले.