केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाबमध्ये दिसून येत आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये Reliance Jio च्या सुमारे 1500 टॉवर्सना लक्ष्य केले. धक्कादायक बाब म्हणजे हे काही महिन्यांपूर्वी रिलायन्सच्या मालकीचे टॉवर होते, परंतू ते मुकेश अंबानी यांनी कॅनडाच्या कंपनीला विकले आहेत.
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. नव्या कृषी कायद्यांचा सर्वाधिक फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या कंपन्यांच्या साधनसंपत्तीला लक्ष्य करण्यात येत आहे. पंजाबमध्ये जिओचे ९ हजार मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी अनेक टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. एका ठिकाणी काही लोकांनी मोबाइल टॉवरसाठी लावण्यात आलेला जनरेटर पळवला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ४३३ मोबाइल टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.
जिओचे हे टॉवर अंबानी य़ांनी कॅनडाच्या ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्टर पार्टनर्स एलपी कंपनीला विकले आहेत. अंबानी यांनीच याची घोषणा सप्टेंबरमध्ये केली होती. याद्वारे अंबानींना 25,215 कोटी रुपये मिळाले आहेत. या पैशांतून रिलायन्स जिओ इंफ्राटेलचे कर्ज चुकते करणार आहे. म्हणजेच शेतकरी जे टॉवर अंबानींचे आहेत असे समजून तोडत आहेत ते कधीच ब्रुकफिल्डच्या मालकीचे झाले आहेत.
हे टॉवर आता रिलायन्सचे नसले तरीही त्यावर जिओची यंत्रणा लागलेली आहे. यामुळे हे टॉवर बंद केले किंवा मोडतोड केली तर रिलायन्सच्या नेटवर्कला नुकसान होत आहे. बिना टॉवरचे नेटवर्क काम करणार नाही, यामुळे जिओच्या महसुलावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. रिलायन्स जिओ आधी पैसे घेते मग सेवा देतेय, यामुळे अनेकांनी रिचार्ज आधीच मारलेली आहेत. ज्य़ांची रिचार्ज संपत आली आहेत, त्यांना ही रिचार्ज मारता न आल्याने किंवा रेंजच नसल्याने ते ही रिचार्ज पुढे मारण्याची शक्यता आहे.