नवी दिल्ली: गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला. या मार्चला हिंसक वळण लागलं. अनेक भागांमध्ये पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आले. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यानंतर दिल्लीसह उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. हिंसाचाराचा निषेध करत दोन शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आंदोलन संपणार अशी चिन्हं दिसू लागली. मात्र गेल्या काही तासांत चित्र पूर्णपणे पालटलं आहे.प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. त्यांनी तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं. भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांनी आंदोलन संपवत असल्याचे संकेत दिले.रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.नरेश टिकेत यांनी महापंचायतीची घोषणा केली. रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. सध्याच्या घडीला राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.