नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यामुळे देशभरात तिची चर्चा आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
पॉपस्टार रिहानाने ट्विटमध्ये कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि दिल्लीच्या काही भागात इंटरनेट सेवा खंडीत केल्याबद्दल भाष्य केलं आहे. रिहानाने #FarmersProtest हॅशटॅग वापरून म्हटलंय की, आपण या मुद्द्यावर भाष्य का करत नाही? मात्र रिहानाने कृषी विधेयकाविरोधात की इंटरनेट सेवा खंडीत केल्याबद्दल ट्विट केलंय का? याबाबत स्पष्टता नाही, मात्र रिहानाचं ट्विट शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मानलं जात आहे.
रिहानाचं ट्विट काही क्षणातच व्हायरल झालं, त्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्न स्टार मिया खलीफा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर ३ दिग्गज सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर केंद्र सरकारविरोधात अनेकजण एकजुट झाल्याचं पाहायला मिळालं, काही लोकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, हे ट्विट एका मोहिमेचा भाग असू शकतं. बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं यापूर्वी अनेकदा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर भाष्य केले आहे. रिहानाने कोविड रिलीफपासून HIV, एड्स जागरूकता, कॅंसर रिसर्च विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्चशिक्षण देण्यापर्यंत अनेक मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जनहिताच्या मुद्द्यावरून केलेल्या कार्याबद्दल Harvard University ने २०१७ मध्ये रिहानाला Humanitarian of the Year या पुरस्काराने गौरवलं आहे.
मात्र रिहानाच्या ट्विटनंतर सेलिब्रिटी विरुद्ध सेलिब्रिटी असं चित्र पाहायला मिळत आहे, कंगना राणौतनं या ट्विटवरून रिहानाला मुर्ख म्हणत हे भारताच्या विभाजनाचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. चीन आपल्या देशाला कमकुवत करून कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही तुमच्यासारखे स्वत:च्या देशाला विकू शकत नाही अशी टीका कंगनानं केली आहे. अनेक ट्विटर युजर्सने रिहानाला भारत सरकारविरोधात अशी पोस्ट करण्यासाठी पैसे दिल्याचाही दावा केला आहे.
त्याचसोबत रिहाना आणि कॅनडाचे खासदार जगमीत सिंह यांच्यातील कथित संबंधाबद्दलही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. फिल्म निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलंय की, रिहाना कॅनडाच्या जगमीत सिंह यांची फॉलोअर आहे.
कोण आहे जगमीत सिंह?
जगमीत सिंह कॅनडाच्या संसदेचे सदस्य आहेत, ज्यांच्यावर खलिस्तानी मोहिमेचे समर्थन करणे आणि दहशतवादी कारवायांचं समर्थन करण्याचा आरोप आहे. जगमीत सिंह यांना कॅनडातील एक कट्टर खलिस्तानी समर्थक म्हणून ओळखलं जातं, भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर त्यांच्या राजकीय दृष्टीकोनामुळे २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना व्हिसा देण्याचं नाकारलं होतं, त्यांनी वारंवार मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
भाजपाच्या महिला मोर्चाच्या सोशल मीडियात प्रमुख प्रिती गांधी यांनी जगमीत सिंहद्वारे रिहानाला धन्यवाद म्हटल्याचं सांगत, त्यांचे दहशतवाद्यांची संबंध असलेल्या बातमीचा फोटो जोडला आहे, प्रिती गांधी म्हणाल्या की, या सर्व गोष्टी एकमेकांना जोडून पाहायला हव्यात. रिहानाच्या प्रतिक्रियेला फॉलो करणारी ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलीफा यांच्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत त्यांचे ट्विट बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
तसेच अशाप्रकारच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तथ्य काय आहे हे जाणून घ्यावे, आणि योग्य काय आहे याची खातरजमा करावी, खळबळजनक सोशल मीडिया हॅशटॅग आणि टीकाटिपण्णी याच्या प्रसिद्धीझोतात येऊन विशेषत: जेव्हा प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि अन्य लोकांचा आधार घेतला जातो, हे योग्य नाही, अशी वक्तव्य करणं जबाबदारपणाचं नाही असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.