प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलकांनी हिंसा घडवली. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराची भयानक दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. यातच लाल किल्ल्यावर तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांपैकी एक गंभीररित्या जखमी झालेल्या पोलिसानं घडलेली संपूर्ण आपबिती कथन केली आहे.
दिल्लीचे स्टेशन हाऊन ऑफिसर पीसी यादव प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर ड्युटी करत होते. यावेळी शेतकरी आंदोलकांनी जबरदस्तीनं आत घुसून धुडगूस घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी यादव यांच्या टीमनं आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या संख्येनं आंदोलक लाल किल्ल्यावर आल्यानं यादव आणि त्यांचे सहकाऱ्यांना आंदोलकांना थोपवणं कठीण झालं होतं. आंदोलकांच्या हातात लाठ्या, काठ्या आणि तलवारी होत्या. त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली, असं पीसी यादव यांनी सांगितलं आहे. पीसी यादव यांच्या डोक्याला, हाताला, नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
"आम्ही आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आमच्यावर हल्ला सुरू केला. त्यांच्याकडे तलवारी, भाले आणि लाठ्याकाठ्या होत्या. हत्यारांनी त्यांनी आमच्यावर हल्ला सुरू केला. हल्ल्यात आमच्या अनेक सहकाऱ्यांना दुखापत झाली. एका सहकाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते पाहून मला त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी किल्ल्याच्या खाली घेऊन जात होतो. तरीही त्यांनी माझं काहीही न ऐकता माझ्यावर तलवारीनं वार करायला सुरुवात केली. तलवारीनं केलेल्या हल्ल्यात माझं हेल्मेटचे दोन तुकडे झाले आणि मलाही पुढे दुखापत झाली. त्यानंतर मीही बेशुद्ध पडलो", असं पीसी यादव यांनी सांगितलं.
"आम्ही त्यांना फक्त थांबविण्याचा प्रयत्न करत होतो. कारण ते शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बळजबरी आम्ही करत नव्हतो. लाठीचार्जही आम्ही करत नव्हतो. पण त्यांनी आमच्यावर हल्ला सुरू केला. यातच आमचे सर्व सहकारी गंभीर जखमी झाले आहेत", असंही ते पुढे म्हणाले.
ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
दिल्लीत काल झालेल्या हिंसाचार ३०० हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यात अनेकजण गंभीररित्या देखील जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हिंसाचारामुळे सरकारी आणि ऐतिहासिक मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचेही व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. कालच्या संपूर्ण घटनेवर आता दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत २०० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच दुपारी ४ वाजता दिल्ली पोलीस संपूर्ण प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही तासांत पोलिसांकडून मोठी कारवाई केली जाण्याचीही शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनी हिंसाचार घडवून आणणाऱ्या, त्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना देण्यात आले आहेत. काल झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करेल. यासाठी आज संध्याकाळपर्यंत एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. हिंसाचाराआधी झालेल्या घडामोडी, त्यानंतर झालेला हिंसाचार या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी पथकाकडून केली जाईल, असे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.