नवी दिल्ली: गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकावला. या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर आता दिल्ली पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असू शकतात, असं श्रीवास्तव यांनी पत्रात म्हटलं आहे. याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन २६ जानेवारीला घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती दिली. दिल्लीत हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.शेतकरी आंदोलकांचा सामना केलेल्या पोलिसांचं आयुक्तांनी पत्रातून कौतुक केलं आहे. 'तुमच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे आपण शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा समर्थपणे सामना करू शकलो. शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात आपले ३९४ सहकारी जखमी झाले. यापैकी काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मी काहींची भेटू घेऊन त्यांची विचारपूस केली आहे,' असं पोलीस आयुक्तांनी सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. श्रीवास्तव जखमी पोलिसांची विचारपूस करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत होते. अमित शहा प्रजासत्ताक दिनापासूनच पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांच्या बैठका घेत आहेत.दिल्ली पोलीस ऍक्शन मोडमध्येट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.