शेतकी संघ संंचालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा कानळदा शिक्षण संस्थेतील अपहार : राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसाचाही संशयीत आरोपींमध्ये समावेश
By admin | Published: May 12, 2016 10:53 PM
जळगाव : जळगाव तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक (शेतकी संघ) जयराज ऊर्फ गोकुळ चव्हाण रा.कानळदा यांच्यासह १२ जणांविरुद्ध तालुका पोलिसात ग्रामीण शिक्षण संस्था, कानळदामध्ये बनावट इतिवृत्त तयार करून २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : जळगाव तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक (शेतकी संघ) जयराज ऊर्फ गोकुळ चव्हाण रा.कानळदा यांच्यासह १२ जणांविरुद्ध तालुका पोलिसात ग्रामीण शिक्षण संस्था, कानळदामध्ये बनावट इतिवृत्त तयार करून २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.यासंदर्भात पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेतकी संघ संचालक गोकुळ चव्हाणसह शरद पूना भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय प्रताप चव्हाण, कानळदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन मोहन रामकृष्ण भंगाळे, प्रकाश निंबा सपकाळे, जळगाव बाजार समितीच्या संचालक विमलबाई भंगाळे यांचे चिरंजीव प्रवीण वामन भंगाळे, उमाकांत वसंत राणे, सुनील शांताराम चव्हाण, सतीश बळीराम चव्हाण, विकास भागवत भंगाळे, बापू बंडू सोनवणे व पंडित जिजाबराव चव्हाण (सर्व रा.कानळदा) यांच्याविरुद्ध भादंवि कलम १९६, ४०५, ४०८, ४१७, ४१९, ४२०, ४६५, ४७५, ४६८, ४७१, ४७२ याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच १२० (ब) हे कलमदेखील संशयित आरोपींना लावण्यासंबंधी सरकारी अभियोक्ता यांचे मत मागविल्याची माहिती तालुका पोलिसातील निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. या संशयितांनी ग्रामीण शिक्षण संस्था, कानळदाचे कामकाज संचालक म्हणून पाहताना संस्थेचे जिल्हा बँँक खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यास फिर्यादी चव्हाण यांनी हरकत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे घेतली होती. त्याचा निकाल फिर्यादी यांच्या बाजूने लागला. त्यानंतर संशयित आरोपींनी जिल्हा बँकेत खोटे कागदपत्र देऊन खाते उघडले. लोकवर्गणीतून पैसे गोळा केले. त्याबाबतही फिर्यादी यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे हरकत घेतली. त्याचा निकालही फिर्यादींच्या बाजूने लागला. यानंतर या संशयित आरोपींनी या बँक खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले, असा आरोप फिर्यादीत नमूद केला आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध लावलेले कलम लक्षात घेता सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. वेळ आली तर अटक केली जाईल, असेही तालुका पोलिसांतर्फे सांगण्यात आले.