जिद्द आणि मेहनत असेल तर तुम्हाला ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या बागवा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या अविनाश कुमारने हे सिद्ध केलं आहे. अविनाशने UPSC परीक्षेत 2022 मध्ये 17 वा क्रमांक मिळविला आहे. UPSC च्या PT मध्ये सलग दोनदा अपयशी झाला पण त्याने हार नाही मानली. तिसर्यांदा UPSC मध्ये 17वा रँक आणून त्याने फक्त गावचाच नाही तर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
25 वर्षीय अविनाश कुमारचे वडील अजय कुमार सिंह हे एक साधे शेतकरी आहेत तर त्यांची आई प्रतिमा देवी एक गृहिणी आहे. अविनाशला 17 वा रँक मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे. अविनाशच्या यशाचा गावकऱ्यांना खूप मोठा अभिमान आहे. अविनाश आणि त्याच्या कुटुंबीयांचे नातेवाईक अभिनंदन करत आहेत.
10वी पर्यंत अविनाशने राणी सरस्वती विद्या मंदिर, फारबिसगंज येथून शिक्षण घेतले. त्याचवेळी त्याने बारावीपर्यंतचे चिन्मय विद्यालय बोकारो झारखंडमधून 93 टक्के गुण मिळवून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. अविनाश यादवपूर विद्यापीठ कोलकाता पश्चिम बंगालमधून 9.6 सीजीपीए मिळवून यशस्वी झाला.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर अविनाशला पश्चिम बंगालच्या वीज प्रकल्पात नोकरीही लागली. असे असूनही अविनाशचे ध्येय काही वेगळेच होते. त्याने 11व्या महिन्यातच नोकरी सोडली आणि दिल्लीला जाऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात मी थोडा निराश झालो, पण तिसर्या प्रयत्नात मेहनत फळाला आली असं त्याने म्हटलं आहे.
अविनाशचे वडील अजय कुमार सिंह यांनी अतिशय भावूक होत सांगितलं की, त्यांना खात्री होती की त्यांचा मुलगा यूपीएससीमध्ये यशस्वी होईल, परंतु त्याला 17 वा क्रमांक मिळाल्याच्या माहितीने खूप आनंद झाला आहे. ते म्हणाले की, जो सत्य आणि प्रामाणिकपणे काम करतो त्याचे चांगले फळ मिळते. दुसरीकडे मुलाच्या यशाचा अभिमान असलेल्या त्याची आई प्रतिमा देवीही आता आयएसची आई झाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आशीर्वाद दिल्याचे प्रतिमा यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.