मुंबई- राज्यातील शेतकरी संपानंतर आता देशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपावर गेला आहे. किसान सभेच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. दादर मार्केटमध्ये निम्म्याच भाजीपाला गाड्या शनिवारी सकाळी दाखल झाल्या. भाजीपाल्याच्या गाड्या कमी आल्याने आता मार्केटमध्ये भाजांच्या दर वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत.
दरम्यान, देशातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या देशव्यापी संपाची हाक दिली होती. सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू झाला असून, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून, भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांची रसद थांबवण्याचा एल्गार शेतकरी संघटनांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रस्त्यावर शहरांची रसद प्रत्यक्ष थांबवली. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला पुरवठ्यावर झाला. शेतकरी संपाचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये जास्त पाहायला मिळतो आहे. तेथिल शेतकरी संपात सहभागी झाल्याने भाजांच्या दरावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. या राज्याच दुधाच्या व भाजीपालाच्या पुरवठ्यावर संपाचा मोठा परिणाम झाला आहे.