Bengaluru GT World Mall :कर्नाटकातील धोतर घातलेल्या एका वृद्धाचा मॉलबाहेरील व्हिडीओ दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश दिला नाही. कारण त्याने धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक भारतीय पोशाख घातला होता. काही वेळातच वृद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. आता राज्य सरकारने याबाबत कडक पावले उचलत त्या मॉलवर कठोर कारवाई केली आहे.
बंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये एका वृद्धाला धोतर घालून चित्रपट पाहण्यापासून रोखल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. व्हिडीओ पाहून देशभरातून लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर लोकांचा रोष पाहून कर्नाटक सरकारने सात दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कपड्यांच्या आधारे कोणालाही प्रवेश करण्यापासून रोखणे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सरकारने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी व्हिडीओमध्ये व्हायरल होत असलेल्या पिता-पुत्रांनी जीटी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढले होते. मात्र जेव्हा ते जीटी मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. त्यानंतर मुलाने यासंबंधीचा व्हिडिओ बनवला. 'सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले आहे की असे कपडे घालून मॉलमध्ये कोणीही जाऊ शकत नाही. मॉल व्यवस्थापनानेच हे काही नियम केले आहेत, असे मुलाने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.
याप्रकरणावरुन अधिवेशनात सरकारने मॉलबाबत मोठा निर्णय घेतला. सरकारने शेतकऱ्याचा कथित अपमान हे त्याच्या सन्मान आणि स्वाभिमानावर हल्ला असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर नगरविकास मंत्री बी. सुरेश यांनी सभागृहात सांगितले की, मॉलवर कायद्यानुसार तात्काळ कारवाई केली जाईल आणि मॉल सात दिवस बंद राहील याची आम्ही खात्री करू.
विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला कारवाई करण्यास सांगितले होतं. राणीबेनूर येथील काँग्रेसचे आमदार प्रकाश कोलीवाड यांनीही या प्रकरणी रोष व्यक्त केला. "हा शेतकरी माझ्या मतदारसंघातील गावातील रहिवासी आहे. या शेतकऱ्याने आपल्या नऊ मुलांना शिक्षण दिले आहे. त्यांचा एक मुलगा बेंगळुरू येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे आणि मुलाला वडिलांना मॉल पाहायला घेऊन जायचे होते. शेतकऱ्याच्या पोशाखामुळे त्याचा अपमान झाला. आता मॉल बंद झाला पाहिजे," असं आमदार प्रकाश कोलीवाड म्हणाले.