हरियाणाच्या कृषिमंत्र्यांचा जावईशोध : भाजपाच्या आणखी एका मंत्र्याचा वाचाळपणाचंदीगड : आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपाच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार ‘सांभाळून बोला’ अशी ताकीद दिली जात असतानाही या पक्षाच्या नेत्यांचा वाचाळपणा अद्याप थांबायचे नाव नाही, हेही यातून अधोरेखित झाले. धनकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बुधवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.काँग्रेसने धनकर यांच्या वक्तव्याची निंदा करताना त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. कृषिमंत्री मात्र आपल्या विधानावर कायम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विनाकारण गाजावाजा केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीत ‘आप’च्या रॅलीत गजेंद्रसिंह नामक शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचा हवाला दिला. धनकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात, असे वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीबाबत विचारले असता कृषिमंत्री म्हणाले, की सरकार अशा भेकडांच्या (आत्महत्या करणारे) आणि गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू शकत नाही.भारतीय कायद्यानुसार आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही जबाबदाऱ्यांपासून दूर पळते आणि हे ओझे आपली पत्नी व निष्पाप मुलांवर टाकत असते. हे लोक फार भेकड असतात. -धनकरशेतकरी पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का ?काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरले असून, केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर टीका करताना या देशातील शेतकरी जे पिकवितात ते ‘मेक इन इंडिया’ नाही का, असा सवाल त्यांनी बुधवारी लोकसभेत उपस्थित केला. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून, त्यांच्या वेदनांकडे सरकार डोळझाक करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.
आत्महत्या करणारे शेतकरी भेकड !
By admin | Published: April 30, 2015 2:13 AM