नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्कर दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव उपस्थित होते. दिल्लीतील संवेदनशील स्थळांवर निमलष्कर दलाचे जवान तैनात केले जातील, असे गृहमंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. निमलष्कर दलाच्या सुमारे १५ ते २० कंपन्या म्हणजे १५०० ते २००० जवान तैनात केले जातील, मात्र नेमकी संख्या सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गणराज्यदिनाच्या बंदोबस्तासाठी राजधानीत यापूर्वीच निमलष्कराचे ४५०० जवान तैनात आहेत.
गृहसचिवांनी दिली स्थितीची माहितीशेतकऱ्यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली परेडशी संबंधित घटनेची माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांना दिली. ट्रॅक्टर परेडला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला हे विशेष.